सिल्लोडला युवासेनेची महत्त्वपूर्ण बैठक

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी): युवा सेनेचे विभागीय सचिव अभिमन्यू अर्जुनराव खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत सिल्लोड येथील आ. अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालयात विशेष सखोल पुनर्निरीक्षण व युवा सेना सदस्य नोंदणी अभियानाच्या पार्श्वभूमीवर युवासेनेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीस सिल्लोडसोयगाव विधानसभा मतदारसंघातील युवा सैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रारंभी संघटनात्मक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. त्यानंतर अंतर्गत मतदार यादी पुनर्निरीक्षण प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करताना नवीन मतदार नोंदणी, नाव दुरुस्ती, वगळलेली नावे समाविष्ट करणे यासह प्रत्येक बूथ स्तरावर जबाबदाऱ्या निश्चित करून अचूक व पारदर्शक मतदार यादी तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. युवा सैनिकांनी गावोगावी जाऊन नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करावी, प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट व्हावे यासाठी विशेष मोहिम राबवावी, असे आवाहन अभिमन्यू खोतकर यांनी केले.

युवा सेना सदस्य नोंदणी अभियान अधिक व्यापक व प्रभावी करण्यावर भर देत प्रत्येक गाव, वॉर्ड व बूथ स्तरावर नव्या युवकांना संघटनेत सहभागी करून संघटन अधिक बळकट करण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार यांनी उपस्थितांना संबोधित करत पक्ष बांधणीच्या दृष्टीने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदें तसेच युवा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबवून पक्ष अधिक सक्षम करण्याचे आवाहन केले. युवकांनी सामाजिक व जनहिताच्या प्रश्नांमध्ये सक्रिय सहभाग घेत जनतेशी सातत्याने संपर्क ठेवावा आणि संघटनेची भूमिका प्रभावीपणे मांडावी, असे त्यांनी सांगितले.

 बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक तयारी, जबाबदाऱ्या व कार्यपद्धती याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. संपूर्ण मतदारसंघात संघटन मजबूत करून पक्षाचा पाया अधिक भक्कम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. 

या बैठकीस युवा सेना जालना लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष गणेश मोहिते, जालना जिल्हाप्रमुख शैलेश घुमारे, लोकसभा सचिव शुभम टेकाडे, विधानसभा अध्यक्ष महादेव वाघ, तालुकाप्रमुख नागेश डवले, राहुल गवारे, कुणाल जाधव, सिल्लोड तालुका शिवसेना प्रमुख केशवराव तायडे, कृउबा समिती संचालक नंदकिशोर सहारे, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष दुर्गाबाई पवार, राजू बाबा काळे, युवा सेना तालुकाप्रमुख धैर्यशील तायडे, शहरप्रमुख शिवा टोम्पे यांच्यासह शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.